काल माझा नवरा एका अनोख्या कौतुक सोहळ्याला गेला होता, निमित्त होतं , स्कूटरचा ५० वा वाढदिवस.
गम्मत वाटली ना? श्री. अनिल चंद्रचूड,ह्यांचे मित्र. त्यांच्या घरी हा कौतुक सोहळा आयोजित केला होता.
१९६७ चं model असलेली व्हेस्पा स्कूटर,१९७२ मधे श्री.चंद्रचूड यांनी २५०० रुपयांना, सेकंडहँड खरेदी केली.ती आजही त्यांच्या वापरात आहे.तीचच हे कौतुक.
त्या काळात स्कूटर असणं हा स्टेटस symbol होता आणि २५०० ही खुप मोठी रक्कम होती. तेव्हा आपली प्रत्येक गोष्ट जपून वापरायची वृत्ती होती आणि तेव्हाच्या वस्तुही जुन्या माणसां सारख्या दणकट होत्या. Use and throw चा जमाना आला नव्हता. चंद्रचूड कुटुंबियांनी या दुचाकीची व्यवस्थित काळजी घेतली आणि तीनीही त्यांना तिसर्या पिढी पर्यंत साथ दिली. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता हा कौतुक सोहळा.ह्यात कुटुंबातील पुढच्या पिढ्याही सामिल झाल्या हे विशेष.
ह्या निमित्ताने काही गोष्टी सहज मनात आल्या.
तरुणपिढीच्या खुप व्यग्र आयुष्यामुळै असेल पण आई वडीलांनासुद्धा सांभाळणे खुप कठीण वाटते. आर्थिक सुबत्तेमुळे जुन्या पिढीलाही नव्या पिढीबरोबर जमवून घेणे आणि त्यांच्या गरजेनुसार उपयोगी पडणे अवघड वाटते. पण एका निर्जिव वस्तुची कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेमानी घेतलेली काळजी आणि त्यामुळे तीनी दिलेली उत्कृष्ट सेवा आपल्याला खुप काही शिकवून जाते.प्रेम आणि आपुलकी खुप अवघड गणितं सोप्या रितीनी सोडवायला मदत करतात.
दुसरं म्हणजे आपण नव्या पिढीला बेजबाबदार,उधळी,भावनाहीन समजतो.पण मोठ्यांचं बघुन वस्तु,नाती निगुतीनी सांभाळणं,त्यांची काळजी घेणं आणि आत्मियता जपणं हे ही तरुणपिढी लीलया करू शकते याचं हे उत्तम उदाहरण. आजच्या धर की फेक संस्कृतीत काही गोष्टी जीवापाड जपायच्या असतात ही शिकवण अशा उदाहरणातून मिळते.
तिसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे छोट्याछोट्या गोष्टीतून आनंद घेता येतो आणि आयुष्यातल्या या छोट्या आनंदाचा सोहळा करता येतो.
आणि सर्वात शेवटी, कंजुष, उद्धट,ठाम मतं असणारै,स्वतःला फार शहाणे समजणारे , संकुचित वृत्तीचे वगैरे वगैरे विशेषणे लावून ज्यांची रोज खिल्ली उडवली जाते, तेच पुणेकर त्यांच्या दुर्गुण समजल्या गेलेल्या गुणांचं बघा कसं सोनं करतात. (Take it easy , बाकीचे ***** कर.)
विशाखा टिपणीस.
२२/१२/२०१७.