धुकं आणि आयुष्य - fog and life.


थंडीची मस्त गुलाबी पहाट.दाट शुभ्र धुकं पांघरलेली धरती.मनात उत्साह सळसळलेला. नवीन काहीतरी शोधायला निघाल्यासारखे आपण चालतोय त्या धुक्यातून.पुढच्या पावलावरचं दिसत नाही. मग मनात उत्सुकता. काय असेल पुढच्या पावलावर? 
कुठुनतरी दूरवर निर्झराची झुळझुळ जाणवते,झाडावर बसलेल्या पाखराची किलबिल,फुलांचा मंद धुंद सुगंध . मन आनंदून जातं. पुढे येणार्या सुखाच्या कल्पनांनी भरून जातं.क्वचित त्या खर्या होतातही. आनंद हात पसरून पुढच्या पावलाला ऊभा असतो. पण नेहमीच असं होतं असं नाही, सुखाच्या स्वप्नात ,आपल्याच मस्तीत चालताना एखादा टोकदार खडा पायाला बोचतो,काटा टोचतो,धुक्यात हरवलेली जवळची फांदी बोचकारून जाते.क्वचित  कधी एखाद्या दगडाला आपण ठेचकाळतो.तर कधी मोठा दगड अचानक मधे येतो आणि  आपण साष्टांग नमस्कार  घालतो.कधी चिखलात पाय रुततो,कपडे खराब होतात. वेदना तर होतातच पण सगळ्यात त्रास देतो स्वप्नांचा झालेला चुराडा.
अशाही परिस्थितीत आपण धडपडत उठतो,चालायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळानी नीट चालता येतं,वेदना पुसट व्हायला लागतात आणि  आठवतं,बोचलेल्या दगडाचा रंग किती सुंदर  होता,ओरखडा काढणार्या फांदीच्या टोकाला अतीसुंदर फुल नुकतच उमलत होतं,दगडावरून धडपडताना शेजारच्या मऊ हिरवळीचा स्पर्श झाला होता,चिखलात पाय पडला तेव्हा आपलं लक्ष शेजारून उडत गेलेल्या रंगीत फुलपाखराकडे होतं. जखमा विसरल्या जातात आणि   लक्षात रहातात ते सोनेरी क्षण.
आपलं आयुष्यही असच आहे नाही का? पुढच्या क्षणाला काय होणार हे गुपित असतं. आपण नेहमी सुखाचीच अपेक्षा करतो. क्वचित  तसं होतही. पण बर्याच वेळी वाट्याला येतं दुःख,अपमान,नैराश्य.पण आपण थांबत नाही.आयुष्य पुढे चालत राहतं. दुःख,अपमान काळाबरोबर फिके होतात,निदान व्हावे आणि  त्यावेळी न जाणवलेले सुखद क्षण अचानक आठवावेत. कोणाचही आयुष्य कायम सुखाच्या पायघड्यांवरून चालणार नाही,पण काळाच्या ओघात मनातलं दुःख निम्म व्हावं आणि सुख दुप्पट.वाटेवर,जीवलग,मित्र,सुहृदअसतील तर जगायची मजा काही औरच.आपली झालेली फजिती आठवून खदखदून हसता आलं पाहिजे.आपल्याशी दुसर्यानी कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे,आपण का त्याच्यात लक्ष द्यावं? दुसर्याशी आपण कसं वागावं हे ठरवायचे पूर्ण अधिकार आपल्याला आहेत.
जर रस्ता स्वच्छ उजेडातला असेल तर नक्कीच  आपण दगड धोंडे,काटेकुटे,चिखल टाळून चालू. पण तिकडे लक्ष देऊन चालताना आपलं दुर्लक्ष होईल नीळ्याशार आभाळाकडे,सुंदर  निर्झराकडे,निसर्गाच्या हिरवाईकडे,रंगीबेरंगी फुलांकडे,पाखरांकडे,जी अचानक आपल्या रस्त्यात आलीत.
आयुष्यातही भविष्यातलं दिसलं तर आपण सुरक्षित मार्ग निवडू आणि  अचानक भेटणार्या सुखाला,आनंदाला पारखं होऊ नाही का?


                   विशाखा टिपणीस
                   ९/१२/२०१७

No comments:

Post a Comment

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...