Showing posts with label marathi thoughts. Show all posts
Showing posts with label marathi thoughts. Show all posts

माझी मैत्रीण


ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर. हांहां, म्हणजे ती माझी तशी गेल्या ४०/४५ वर्षांपासूनची मैत्रीण आहेच, पण आज मी बोलत्ये ते तीच्याबरोबर असलेल्या लाल पांढर्या साडीतल्या गोड मुली विषयी. आनंद, उत्साह, सकारात्मकता ह्यांचा झरा नव्हे चक्क धबधबा. लौकिकार्थाने वय वर्षे फक्त  नव्वद.
सुलभाची आई, हो, मी तीला तशीच हाक मारते. एकदा वाटलं होतं, लिहायच्या आधी सुलभाला नांव विचारावं पण मला खोटारडेपणा नाही आवडत. मग उगीच खोटी जवळीक कशाला दाखवायची?
तर सांगत काय होते, आईची आणि  माझी भेट बहुतेक  होते ती सुलभाच्या कार्यक्रमात. मी आवर्जून  जाते आणि  आई आलेलीच असते. बहुदा दुसर्या रांगेत  शांत बसलेली असते. लोकांनी येऊन आपल्याला  विचारावं, मान द्यावा अशी कुठलीच अपेक्षा  नाही. पण माझ्यासारखे कितीतरी लोक भेटायला जातातच कार्यक्रमापूर्वी. आमचा दोघींचा संवादही ठरलेला.
नमस्कार , कशा आहात?
छान! तू कशी आहेस?
मस्त!
घरी आली नाहीस बर्याच दिवसात. ये आता.

नक्की , साडी मस्त आहे आई!
मग आई फक्त  गोड हसते. आईच्या साड्या प्रसन्न हलक्या रंगाच्या, कडक स्टार्च  इस्त्रीच्या , सुंदर  असतात. साडी कधीची हाप्रश्न मी चुकुनही विचारत नाही. कारण आईची साडी नेहमी नविन वाटणारी टकाटक असते.
सुलभा सांगते, कार्यक्रमाला येताना आई साडी उत्साहाने निवडते.ही नको, ही मागच्या वेळी विशाखानी पाहिली आहे, इतकी पक्की आठवणही असते.

सुलभाच्या घरी जेवायचेच आमंत्रण  असते. आईचा तसा आग्रहच असतो. आम्हीही भरपूर वेळ घेऊनच जातो. कारण सुलभा म्हणजे विविध विषय, अनुभव यांचे  ज्ञानभांडार, सिनेक्षेत्रातील तर मी तीला encyclopedia म्हणते. १९३१ पासूनच्या कुठच्याही सिनेमाबद्दल काहीही विचारा. शिवाय अनेक  महान लोकांचे किस्से. त्यामुळे एकदा सुलभा बोलायला लागली की तास नी तास श्रोता होण्यात मजा असते. पण माझ्या ह्या तरुण मैत्रीणीला काही चैन नसतं. म्हणजे तीच्याकडेही बोलायला अनंत विषय आहेत, माहितीचा व अनुभवाचा खजिनाही आहेच. पण तीची लगबग असते पाहुण्यांना चहापाणी, खाणेपिणे करण्याची.जेवायला बसल्यावर आग्रह असा की आपण बकासुराचे वंशज आहोत असं ह्यांना वाटतं की काय असा संशय मला येतो. खूप झालं तर सुलभाच मदतीला येते. आई नाही जाणार आता तीला.असं सांगावं लागतं. दरवेळचा बेतही भरभक्कम असतो.
पंधरा दिवसांपूर्वी  सुलभाकडे आम्ही तीन मैत्रीणी, माया, विजू व मी व विजूची आई गेलो होतो( ही दुसरी मैत्रीण, वय वर्षे ९४). आम्ही गेल्यापासून सुलभाच्या आईची लगबग सुरू झाली. "चहा करू का गं?" हा प्रश्न दर पांच मिनिटांनी सुरू झाला.मी करू का? हा माझा प्रश्न  साफ घुडकावला गेला. शेवटी आईने केलेला दाट सुंदर  चहा सुलभा घेऊन आली. खरोखर इतका सुंदर  दाट चहा, मस्त फ्रेश झालो.
गप्पांच्या ओघात माझ्या केसाची क्लिप मला त्रासदायक वाटत होती. मी सुलभाकडे रबरबँड मागितला, आईने पटकन खुर्चीच्या पाठीच्या दांड्याला लावलेला काढून दिला. म्हणाली, वेळेला मिळत नाही म्हणून मी इथे लावते. मला मजा वाटली आणि  रबरबँड लावायची जागाही आवडली. मग आम्हाला ड्रेसची सुंदर  कापडं मिळाली. आईने स्वतः सुलभाबरोबर जाऊन आवडीने आमच्यासाठीआणली होती. वेळेत जेवायला बसलो. गरम गरम बटाटेवडे, चविष्ट चटणी, तव्यावरची पुरणपोळी, त्यावर छोट्या पळीने भरपूर तूप, आई स्वतः आग्रहाने वाढत होती. पोटभर जेवणानंतर पान.
नंतर स्वैपाकाच्या बाई घरी निघाल्या. आम्ही सर्वांनी त्यांच्या सुगरणपणाचं कौतुक  केलं. पण आईने कोरडं कौतुक  न करता त्यांच्या घरी भरपूर डबा भरून दिला. आम्हाला घरी सोडायला आलेले रिक्शावाले व सोसायटीचे रखवालदार यांना वर बोलावून स्वतःच्या हातानी त्यांना  पोटभर जेऊ घातलं. आम्ही घरी परतल्यावरच मायलेकी जेवल्या. आम्हाला निरोप देताना भगर, दाण्याची आमटी खाण्यासाठी येण्याचं आमंत्रण मिळालं. हे अगत्य, व त्यातून मिळालेलं समाधान लाखमोलाचं होतं.
९० वर्षांमधे अनेक  खाचखळगे,आनंद- संकटं, सुखं-दुःख, यश-अपयश आलंच असणार. पण सगळ्याचा सामना करतच,आपल्या बर्यावाईट अनुभवांनी आयुष्य कसं समृद्ध व परिपूर्ण  जगावं आणि  दुसर्यालाही आनंद द्यावा ह्याचं हे उदाहरण. सुलभा म्हणाली, आई हाॕटेलमधे जाऊ या का? तर ,हो, चल की, म्हणून तयार. जे असेल त्यात आनंद.सुलभा सांगते,  आता माझं काय राहिलय? कशात रामच वाटत नाही आता,किती दिवस राहिले आमचे, असली निराशावादी  वाक्य कधीही आईच्या तोंडी नसतात. उलट सुलभाला प्रत्येक नव्या कामासाठी प्रोत्साहन असतं. माणसं जोडलेली, त्यामुळे एकटेपणा नाही,वाचन, मनन, देवावरची, माणुसकीवरची श्रद्धा यामुळे आलेली प्रगल्भता, सर्व  विषयांची आवड, त्यामुळे कुठच्याही कंपनीत सामावून जाता येतं. अजून काय पाहिजे आयुष्यात?
आईचा गोरापान वर्ण, सुंदर  चेहरा, पण तसा तो नसता तरी ती सुंदरच दिसली असती. कारण सदा प्रसन्न चेहरा आणि  दात यायच्याआधी बाळाचं जसं निरागस हंसू असतं ना तसच बोळक्या तोंडाचं हंसू. एकदा भेटलं तर पुढच्या २/४ महिन्यांची उर्जा नक्की  मिळते.
चान्स मिळाला तर एकदा भेटाच माझ्या ह्या मैत्रीणीला. तुमचं मनापासून भरभरून हसरं स्वागत होईल खात्रीनी.


विशाखा टिपणीस
२०/०७/२०१९

बालदिन - बालमन


काल एका काकांचा फोन आला. त्यांचा माझा परिचय अगदी अल्प. माझ्या सासूच्या मैत्रीणीचे यजमान. मावशी आमच्याकडे  खूप यायच्या. पण गेली कित्येक वर्षे त्यांना स्मृतिभ्रंश झालाय. मागे एकदा त्यांना भेटून आले मग जाऊ जाऊ म्हणत मागेच पडलं.
तर काय सांगत होते, फोनवर काकांनी परिचय दिला. एकदम नाही आलं लक्षात. काही क्षणांनंतर मला ओळख पटली. तसे काका गरजले, " ट्यूब उशीरा पेटली तुझी!" नंतरचं बरचसं संभाषण मी बरेच दिवसात त्यांच्याकडे  गेले नाही, फोन केला नाही,माझ्या बातम्या त्यांना कशा बाहेरून कळल्या, वगैरे आरोपांच्या फैरी झडल्या. मी माझी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण अडचणी सर्वांनाच असतात म्हणत तो परतवला गेला.
मग हळू हळू संभाषणाची गाडी ते कसे बुद्धीमान आहेत,त्यांची अर्थशास्त्रातली Ph.D , त्यांनी आयुष्यात गाजवलेलं कर्तुत्व,त्यांची गाण्याची आवड,अफाट वाचन,नियमित फिरणं,चांगली तब्येत( वय वर्ष ८६),स्मृतिभ्रंश झालेल्या बायकोला ते कसे लहान मुलासारखे सांभाळतात वगैरे अनेक विषयांभोवती फिरली. माझी भूमिका अर्थातच श्रोत्याची.
बोलता बोलता त्यांनी बजावलं १ ते ४ त्यांना disturb करायचं नाही,सात नंतरच फोन करायचा. भेटायला ते म्हणतील तेव्हाच जायचं. त्यांची स्वतःची मुलगी त्यांना गेल्या वर्षात ३/४ वेळा भेटायला आली होती पुण्यातच असून.( काही कारण असेल, मला माहित नसणारं)
फोन बंद करता करता म्हणाले, "फोन कर मधुन अधुन. भेटायला आलीस तर खूप छान छान कविता ऐकवीन तुला, माझ्याकडे  खूप कलेक्शन आहे.
खरं तर मला जरा रागंच आला होता. त्यांचा चेहराही मला स्मरत नव्हता. पण मग एक करारी तरीही केविलवाणा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तरुणपणातला ताठा संपलेला,परिस्थितीने काळवंडलेला,मीपणा अट्टाहासाने जपणारा,एकाकी ,वृद्ध तरीही जगायची उर्मी असणारा, कोणीतरी श्रोता होऊन आपलं मनोगत ऐकावं अशी अपेक्षा करणारा,केविलवाणेपणा मीपणानी झाकणारा,तरीही माणसातल्या लहान मुलाचा निरागस चेहरा.
             आणि
खूप समाधान वाटलं काकांनी माझी निवड केली श्रोता म्हणून. ठरवलं चांगला श्रोता व्हायचं, अशाच कुणा काका,मावशी किंवा अगदी समवयस्कांचा. आताच्या काळात फार गरज आहे अशा श्रोत्यांची.
पुढे आपण म्हातारे होऊ तेव्हा कदाचित कोणाला ऐकायला सवड नसेल. म्हणून आत्ताच मित्र,मैत्रीणी, आप्त,हितचिंतक  ज्यांना ज्यांना जेव्हा भेटता येईल,बोलता येईल तेव्हा मन मोकळं करू या,त्यांचं मन जाणून घेऊया. माणसात राहू. प्रत्येक  क्षण जगून घेऊ.  मनातलं लहान मुल जागं ठेऊ.
मनातलं लहानमुल जागं ठेवणार्या प्रत्येकाला बालदिनाच्या रंगीत संगित,गोड शुभेच्छा!
विशाखा टिपणीस
१४/११/२०१८

दोन मृत्युः आत्मघात आणि बलीदान

दोन मृत्यु! 

अगदी तरुणच दोघही. अजून धड आयुष्य न पाहिलेले. दोन्ही मृत्यु नैसर्गिक  नव्हते. एकानी मृत्युला आपणहून कवटाळलं आणि  दुसर्यानी मृत्युला छातीवर झेललं. तरीही किती फरक त्या दोन मृत्युंमधे. एक आत्महत्या आणि  दुसरं बलीदान.
आत्महत्या जी नैराश्यातून आली.नुसत्या नैराश्यातून आली असेल? की कोणीतरी brain washing केलं असेल? आपल्या मरणानी आपल्या समाजाचं ,कुटुंबाचं भलं होईल,आपण हिरो ठरू असा काहीसा विचार किंवा अविचार असेल कोणीतरी भरवून दिलेला? जीव देताना आपले असहाय आईवडील,कुटुंब डोळ्यासमोर आलच नसेल? बलीदानाने तो काही काळापुरता,काही लोकांपुरता हिरो ठरलाही.पण हे बलीदान होतं की आत्मघात. त्याच्या मृत्युला बलीदान ठरवून काही राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नही केला असेल. तो एकाच जमातीचा भाग ठरला. जवळचे सोडून त्याचं नांवही सगळे विसरून जातील. त्याला नाहीच पण त्याच्या कुटुंबालाही काही फायदा मिळणार नाही. कुणाच्यातरी नादी लागून ओढवून घेतलेली बरबादी.जिद्द धरून जिवंत राहीला असता तर काहीही करू शकला असता.
दुसरा मृत्यु देशासाठी . खरं बलीदान. मृत्यु समोर दिसत असताना त्याच्याही डोळ्यासमोर आले असतील त्याचे प्रेमळ आईवडील,राखी तयार ठेऊन वाट पहाणारी बहिण,अजूही नविनच असणारी प्रियतमा आणि  दोन वर्षाचं अबोध पिलू.पण क्षणार्धात  समोरचा राक्षस माझ्या लाखो आईवडीलांचे,प्रिय देशबंधुभगिनींचे प्राण घेऊ शकतो मग त्याला मारायलाच पाहिजे,माझे ध्येय देशरक्षणाचे आहे, हा अगदी सुसंगत  पक्का विचार. शत्रूला तर चारीमुंड्या चीत केलच पण मृत्युला पुढे होऊन त्यानी छातीवर घेतलं तेव्हा मृत्युसुद्धा भयभीत झाला असेल.
ज्याच्या मरणाने प्रत्येक  भारतीय खराखुरा हळहळला,रडला,ज्याचं नांव अत्यंत आदरपूर्वक,अभिमानाने कायम घेतलं जाईल तो वीर हाच खरा हीरो. त्याच्या कुटुंबाचा सारा देश कायम ऋणी राहील. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोनी लोक जमले ते आपले सर्व भेदभाव विसरून.श्रीमंत गरीब,स्त्री पुरूष,बडे सामान्य,सर्व स्तराचे,जाती धर्माचे लोक अश्रू ढाळत त्याला मानवंदना देत होते तेव्हा ते फक्त  भारतीय होते.
एकाच्या मृत्युने समाजातली दरी अधिक रुंदावली आणि  दुसर्याच्या मृत्युने सामाजिक  एकीचे दर्शन घडवले.
मेजर कौस्तुभ राणे आम्ही भारतीय, तुझे बलीदान कधीच विसरणार नाही. आमच्या मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवून तू अमर झालास.तुझ्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. 
                   विशाखा टिपणीस
                   ११/०८/२०१८

एक अनोखा सुवर्ण मोहोत्सव -

    काल माझा नवरा एका अनोख्या कौतुक सोहळ्याला गेला होता, निमित्त होतं , स्कूटरचा ५० वा वाढदिवस.
    गम्मत वाटली ना? श्री. अनिल चंद्रचूड,ह्यांचे मित्र. त्यांच्या घरी हा कौतुक सोहळा आयोजित केला होता. 

    १९६७ चं model असलेली व्हेस्पा स्कूटर,१९७२ मधे श्री.चंद्रचूड यांनी २५०० रुपयांना, सेकंडहँड खरेदी केली.ती आजही त्यांच्या वापरात आहे.तीचच हे कौतुक. 


       


  त्या काळात स्कूटर असणं हा स्टेटस symbol होता आणि २५०० ही खुप मोठी रक्कम होती. तेव्हा आपली प्रत्येक गोष्ट जपून वापरायची वृत्ती होती आणि तेव्हाच्या वस्तुही जुन्या माणसां सारख्या दणकट होत्या. Use and throw चा जमाना आला नव्हता. चंद्रचूड कुटुंबियांनी या दुचाकीची व्यवस्थित काळजी घेतली आणि  तीनीही त्यांना तिसर्या पिढी पर्यंत साथ दिली. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता हा कौतुक सोहळा.ह्यात कुटुंबातील पुढच्या पिढ्याही सामिल झाल्या हे विशेष.
           ह्या निमित्ताने काही गोष्टी सहज मनात आल्या.


       


    तरुणपिढीच्या खुप व्यग्र आयुष्यामुळै असेल पण आई वडीलांनासुद्धा सांभाळणे खुप कठीण वाटते. आर्थिक सुबत्तेमुळे जुन्या पिढीलाही नव्या पिढीबरोबर जमवून घेणे आणि  त्यांच्या गरजेनुसार उपयोगी पडणे अवघड वाटते. पण एका निर्जिव वस्तुची कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेमानी घेतलेली काळजी आणि  त्यामुळे तीनी दिलेली उत्कृष्ट सेवा आपल्याला खुप काही शिकवून जाते.प्रेम आणि  आपुलकी खुप अवघड गणितं सोप्या रितीनी सोडवायला मदत करतात.


       

  दुसरं म्हणजे आपण नव्या पिढीला बेजबाबदार,उधळी,भावनाहीन समजतो.पण मोठ्यांचं बघुन वस्तु,नाती निगुतीनी सांभाळणं,त्यांची काळजी घेणं आणि  आत्मियता जपणं हे ही तरुणपिढी लीलया करू शकते याचं हे उत्तम उदाहरण. आजच्या धर की फेक संस्कृतीत काही गोष्टी जीवापाड जपायच्या असतात ही शिकवण अशा उदाहरणातून मिळते.
         तिसरी जाणवलेली गोष्ट म्हणजे छोट्याछोट्या गोष्टीतून आनंद घेता येतो आणि आयुष्यातल्या या छोट्या आनंदाचा सोहळा करता येतो.
          आणि  सर्वात शेवटी, कंजुष, उद्धट,ठाम मतं असणारै,स्वतःला फार शहाणे समजणारे , संकुचित वृत्तीचे वगैरे वगैरे विशेषणे लावून ज्यांची रोज खिल्ली उडवली जाते, तेच पुणेकर त्यांच्या दुर्गुण समजल्या गेलेल्या गुणांचं बघा कसं सोनं करतात. (Take it easy , बाकीचे ***** कर.)


               
                विशाखा टिपणीस.
                २२/१२/२०१७.


धुकं आणि आयुष्य - fog and life.


थंडीची मस्त गुलाबी पहाट.दाट शुभ्र धुकं पांघरलेली धरती.मनात उत्साह सळसळलेला. नवीन काहीतरी शोधायला निघाल्यासारखे आपण चालतोय त्या धुक्यातून.पुढच्या पावलावरचं दिसत नाही. मग मनात उत्सुकता. काय असेल पुढच्या पावलावर? 
कुठुनतरी दूरवर निर्झराची झुळझुळ जाणवते,झाडावर बसलेल्या पाखराची किलबिल,फुलांचा मंद धुंद सुगंध . मन आनंदून जातं. पुढे येणार्या सुखाच्या कल्पनांनी भरून जातं.क्वचित त्या खर्या होतातही. आनंद हात पसरून पुढच्या पावलाला ऊभा असतो. पण नेहमीच असं होतं असं नाही, सुखाच्या स्वप्नात ,आपल्याच मस्तीत चालताना एखादा टोकदार खडा पायाला बोचतो,काटा टोचतो,धुक्यात हरवलेली जवळची फांदी बोचकारून जाते.क्वचित  कधी एखाद्या दगडाला आपण ठेचकाळतो.तर कधी मोठा दगड अचानक मधे येतो आणि  आपण साष्टांग नमस्कार  घालतो.कधी चिखलात पाय रुततो,कपडे खराब होतात. वेदना तर होतातच पण सगळ्यात त्रास देतो स्वप्नांचा झालेला चुराडा.
अशाही परिस्थितीत आपण धडपडत उठतो,चालायचा प्रयत्न करतो. थोड्या वेळानी नीट चालता येतं,वेदना पुसट व्हायला लागतात आणि  आठवतं,बोचलेल्या दगडाचा रंग किती सुंदर  होता,ओरखडा काढणार्या फांदीच्या टोकाला अतीसुंदर फुल नुकतच उमलत होतं,दगडावरून धडपडताना शेजारच्या मऊ हिरवळीचा स्पर्श झाला होता,चिखलात पाय पडला तेव्हा आपलं लक्ष शेजारून उडत गेलेल्या रंगीत फुलपाखराकडे होतं. जखमा विसरल्या जातात आणि   लक्षात रहातात ते सोनेरी क्षण.
आपलं आयुष्यही असच आहे नाही का? पुढच्या क्षणाला काय होणार हे गुपित असतं. आपण नेहमी सुखाचीच अपेक्षा करतो. क्वचित  तसं होतही. पण बर्याच वेळी वाट्याला येतं दुःख,अपमान,नैराश्य.पण आपण थांबत नाही.आयुष्य पुढे चालत राहतं. दुःख,अपमान काळाबरोबर फिके होतात,निदान व्हावे आणि  त्यावेळी न जाणवलेले सुखद क्षण अचानक आठवावेत. कोणाचही आयुष्य कायम सुखाच्या पायघड्यांवरून चालणार नाही,पण काळाच्या ओघात मनातलं दुःख निम्म व्हावं आणि सुख दुप्पट.वाटेवर,जीवलग,मित्र,सुहृदअसतील तर जगायची मजा काही औरच.आपली झालेली फजिती आठवून खदखदून हसता आलं पाहिजे.आपल्याशी दुसर्यानी कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे,आपण का त्याच्यात लक्ष द्यावं? दुसर्याशी आपण कसं वागावं हे ठरवायचे पूर्ण अधिकार आपल्याला आहेत.
जर रस्ता स्वच्छ उजेडातला असेल तर नक्कीच  आपण दगड धोंडे,काटेकुटे,चिखल टाळून चालू. पण तिकडे लक्ष देऊन चालताना आपलं दुर्लक्ष होईल नीळ्याशार आभाळाकडे,सुंदर  निर्झराकडे,निसर्गाच्या हिरवाईकडे,रंगीबेरंगी फुलांकडे,पाखरांकडे,जी अचानक आपल्या रस्त्यात आलीत.
आयुष्यातही भविष्यातलं दिसलं तर आपण सुरक्षित मार्ग निवडू आणि  अचानक भेटणार्या सुखाला,आनंदाला पारखं होऊ नाही का?


                   विशाखा टिपणीस
                   ९/१२/२०१७

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...