माझी मैत्रीण


ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर. हांहां, म्हणजे ती माझी तशी गेल्या ४०/४५ वर्षांपासूनची मैत्रीण आहेच, पण आज मी बोलत्ये ते तीच्याबरोबर असलेल्या लाल पांढर्या साडीतल्या गोड मुली विषयी. आनंद, उत्साह, सकारात्मकता ह्यांचा झरा नव्हे चक्क धबधबा. लौकिकार्थाने वय वर्षे फक्त  नव्वद.
सुलभाची आई, हो, मी तीला तशीच हाक मारते. एकदा वाटलं होतं, लिहायच्या आधी सुलभाला नांव विचारावं पण मला खोटारडेपणा नाही आवडत. मग उगीच खोटी जवळीक कशाला दाखवायची?
तर सांगत काय होते, आईची आणि  माझी भेट बहुतेक  होते ती सुलभाच्या कार्यक्रमात. मी आवर्जून  जाते आणि  आई आलेलीच असते. बहुदा दुसर्या रांगेत  शांत बसलेली असते. लोकांनी येऊन आपल्याला  विचारावं, मान द्यावा अशी कुठलीच अपेक्षा  नाही. पण माझ्यासारखे कितीतरी लोक भेटायला जातातच कार्यक्रमापूर्वी. आमचा दोघींचा संवादही ठरलेला.
नमस्कार , कशा आहात?
छान! तू कशी आहेस?
मस्त!
घरी आली नाहीस बर्याच दिवसात. ये आता.

नक्की , साडी मस्त आहे आई!
मग आई फक्त  गोड हसते. आईच्या साड्या प्रसन्न हलक्या रंगाच्या, कडक स्टार्च  इस्त्रीच्या , सुंदर  असतात. साडी कधीची हाप्रश्न मी चुकुनही विचारत नाही. कारण आईची साडी नेहमी नविन वाटणारी टकाटक असते.
सुलभा सांगते, कार्यक्रमाला येताना आई साडी उत्साहाने निवडते.ही नको, ही मागच्या वेळी विशाखानी पाहिली आहे, इतकी पक्की आठवणही असते.

सुलभाच्या घरी जेवायचेच आमंत्रण  असते. आईचा तसा आग्रहच असतो. आम्हीही भरपूर वेळ घेऊनच जातो. कारण सुलभा म्हणजे विविध विषय, अनुभव यांचे  ज्ञानभांडार, सिनेक्षेत्रातील तर मी तीला encyclopedia म्हणते. १९३१ पासूनच्या कुठच्याही सिनेमाबद्दल काहीही विचारा. शिवाय अनेक  महान लोकांचे किस्से. त्यामुळे एकदा सुलभा बोलायला लागली की तास नी तास श्रोता होण्यात मजा असते. पण माझ्या ह्या तरुण मैत्रीणीला काही चैन नसतं. म्हणजे तीच्याकडेही बोलायला अनंत विषय आहेत, माहितीचा व अनुभवाचा खजिनाही आहेच. पण तीची लगबग असते पाहुण्यांना चहापाणी, खाणेपिणे करण्याची.जेवायला बसल्यावर आग्रह असा की आपण बकासुराचे वंशज आहोत असं ह्यांना वाटतं की काय असा संशय मला येतो. खूप झालं तर सुलभाच मदतीला येते. आई नाही जाणार आता तीला.असं सांगावं लागतं. दरवेळचा बेतही भरभक्कम असतो.
पंधरा दिवसांपूर्वी  सुलभाकडे आम्ही तीन मैत्रीणी, माया, विजू व मी व विजूची आई गेलो होतो( ही दुसरी मैत्रीण, वय वर्षे ९४). आम्ही गेल्यापासून सुलभाच्या आईची लगबग सुरू झाली. "चहा करू का गं?" हा प्रश्न दर पांच मिनिटांनी सुरू झाला.मी करू का? हा माझा प्रश्न  साफ घुडकावला गेला. शेवटी आईने केलेला दाट सुंदर  चहा सुलभा घेऊन आली. खरोखर इतका सुंदर  दाट चहा, मस्त फ्रेश झालो.
गप्पांच्या ओघात माझ्या केसाची क्लिप मला त्रासदायक वाटत होती. मी सुलभाकडे रबरबँड मागितला, आईने पटकन खुर्चीच्या पाठीच्या दांड्याला लावलेला काढून दिला. म्हणाली, वेळेला मिळत नाही म्हणून मी इथे लावते. मला मजा वाटली आणि  रबरबँड लावायची जागाही आवडली. मग आम्हाला ड्रेसची सुंदर  कापडं मिळाली. आईने स्वतः सुलभाबरोबर जाऊन आवडीने आमच्यासाठीआणली होती. वेळेत जेवायला बसलो. गरम गरम बटाटेवडे, चविष्ट चटणी, तव्यावरची पुरणपोळी, त्यावर छोट्या पळीने भरपूर तूप, आई स्वतः आग्रहाने वाढत होती. पोटभर जेवणानंतर पान.
नंतर स्वैपाकाच्या बाई घरी निघाल्या. आम्ही सर्वांनी त्यांच्या सुगरणपणाचं कौतुक  केलं. पण आईने कोरडं कौतुक  न करता त्यांच्या घरी भरपूर डबा भरून दिला. आम्हाला घरी सोडायला आलेले रिक्शावाले व सोसायटीचे रखवालदार यांना वर बोलावून स्वतःच्या हातानी त्यांना  पोटभर जेऊ घातलं. आम्ही घरी परतल्यावरच मायलेकी जेवल्या. आम्हाला निरोप देताना भगर, दाण्याची आमटी खाण्यासाठी येण्याचं आमंत्रण मिळालं. हे अगत्य, व त्यातून मिळालेलं समाधान लाखमोलाचं होतं.
९० वर्षांमधे अनेक  खाचखळगे,आनंद- संकटं, सुखं-दुःख, यश-अपयश आलंच असणार. पण सगळ्याचा सामना करतच,आपल्या बर्यावाईट अनुभवांनी आयुष्य कसं समृद्ध व परिपूर्ण  जगावं आणि  दुसर्यालाही आनंद द्यावा ह्याचं हे उदाहरण. सुलभा म्हणाली, आई हाॕटेलमधे जाऊ या का? तर ,हो, चल की, म्हणून तयार. जे असेल त्यात आनंद.सुलभा सांगते,  आता माझं काय राहिलय? कशात रामच वाटत नाही आता,किती दिवस राहिले आमचे, असली निराशावादी  वाक्य कधीही आईच्या तोंडी नसतात. उलट सुलभाला प्रत्येक नव्या कामासाठी प्रोत्साहन असतं. माणसं जोडलेली, त्यामुळे एकटेपणा नाही,वाचन, मनन, देवावरची, माणुसकीवरची श्रद्धा यामुळे आलेली प्रगल्भता, सर्व  विषयांची आवड, त्यामुळे कुठच्याही कंपनीत सामावून जाता येतं. अजून काय पाहिजे आयुष्यात?
आईचा गोरापान वर्ण, सुंदर  चेहरा, पण तसा तो नसता तरी ती सुंदरच दिसली असती. कारण सदा प्रसन्न चेहरा आणि  दात यायच्याआधी बाळाचं जसं निरागस हंसू असतं ना तसच बोळक्या तोंडाचं हंसू. एकदा भेटलं तर पुढच्या २/४ महिन्यांची उर्जा नक्की  मिळते.
चान्स मिळाला तर एकदा भेटाच माझ्या ह्या मैत्रीणीला. तुमचं मनापासून भरभरून हसरं स्वागत होईल खात्रीनी.


विशाखा टिपणीस
२०/०७/२०१९

स्पर्धा

कालचा १४ जुलै २०१९ चा रविवार  अविस्मरणीय ठरला. स्पर्धा  म्हणजे काय, ह्याचा खरा अर्थ कळला.
क्रिकेट  विश्वकप स्पर्धेत तांत्रिक  नियम लावून इंग्लंड विश्वकपाचा मानकरी  ठरला आणि  त्याच नियमामुळे न्यूझीलंडला विश्वकप गमवावा लागला.
जो जिता वोही सिकंदर हे खरं असलं तरी आणि  इंग्लंडचा विजयोत्सव व न्यूझीलंडची अश्रुपूर्ण निराशा अगदी सहाजिक असली तरी आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा अप्रतिम खेळ दोन्ही संघांनी केला. दोन्ही संघांची कामगिरी त्यांच्या देशाची मान उंचावणारीच होती.  प्रेक्षकांच्या दृष्टीने दोन्ही संघ जगज्जेते ठरले.
असा न भूतो न भविष्यति सामना खेळल्याबद्दल दोन्ही संघांचं मनापासून कौतुक  व अभिनंदन.


टेनिसमधेही विंबल्डनचं महत्त्व  आगळं आहे. काल जगज्जेता फेडरर आणि  नव्या दमाचा जोकोविच यांच्यातला अंतिम सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. दोनही तुल्यबळ खेळाडूत उजवा डावा नव्हताच. दोघही अप्रतिम. शेवटच्या क्षणी कुणीतरी एक जिंकणार. जोकोविच जिंकला. जोकोविचचं कौतुक  करणार्या प्रत्येक  प्रेक्षकाच्या मनात फेडररबद्दलही तेवढच कौतुक  दाटलं होतं. त्याचं स्थान प्रत्येक  मनात अढळच राहिलं. एकमेकांच्या  विषयी त्या दोघांनी आदरपूर्वक केलेली वक्तव्य, दोघांचाही सुसंस्कृत पणा दाखवणारी होती.


आयुष्यही असंच असावं नाही का? निकोप स्पर्धा  जरूर असावी. आपापली क्षमता आजमावणारी, वाढवणारी, एकमेकाबद्दल आदर आणि  प्रेम दर्शविणारी आणि  बाकीच्यांना भरपूर आनंद देणारी.
विशाखा टिपणीस.
१५/०७/२०१९

लघुकथा


रंगुनी रंगात या.


मोकळ्या आकाशाखाली असं पहुडणं नयनला फार आवडायचं. त्यात तो बर्याच दिवसांनी गावी आला होता.
वाडवडीलांची जमीन, नारळीपोफळीच्या बागा,वडीलोपार्जित घर इथेच असल्याने त्याच्या वडीलांनी इथेच डाॕक्टरकी केली. त्याचं  दहावीपर्यंतचं home schooling ही इथच झालं. मग मात्र आई बाबांनी शहरात जायचा निर्णय घेतला.
शहरात नविन बंगला बांधला, क्लिनिक थाटलं. बाबांचा स्वभाव आणि  हातगुण दोन्हीमुळे छान जम बसला थोड्याच दिवसात. कशाला काही कमी नव्हतं. नयनसाठी नवी गाडी.  ड्रायवर रोज काॕलेजला सोडायचा काही दिवस. पण नयनच्या गोड स्वभावामुळे लवकरच खूप मित्र जमले. मग कोणाच्यातरी स्कूटरवर नाहीतर बाईकवर काॕलेजला जाणं येणं सुरू झालं.
नयनचे आईबाबा प्रेमळ, स्नेहशील, मनमोकळे. नयनवर कधी कसलं दडपण नव्हतं. तोही हुशार ,मनमेळावू. गावाकडे जरा एकटा वाढलेला नयन इथे मित्रांमधे रमून गेला.
अभ्यासात हुशार असलेला नयन वक्तृत्व स्पर्धा  गाजवायचा, बुद्धिबळ  खेळायचा,  गणपतीत ढोल वाजवायलापण पुढे असायचा.
आई बाबांबरोबर त्याने परदेश वार्याही केल्या होत्या. आणि  गावाकडेतर महिन्या दोन महिन्यांनी चक्कर  व्हायचीच.
बघताबघता MSW करून नयन समाजकार्याला भिडला. त्यानी एक संस्था सुरू केली. अनाथ लहान मुलांना मदत करणारी. काम वाढत होतं, मदतनीस वाढत होते.मनापासून काम करणार्या नयनचं कौतुक होत होतं. परदेशी संस्थांबरोबरही संबंध असल्याने परदेशवार्याही होत होत्या. त्यात गावाकडच्या चकरा जरा कमी झाल्या होत्या.
अशातच त्याची मदतनीस म्हणुन डाॕ. निहिरा त्याच्या आयुष्यात आली. सतत खळखळून हसणारी, खूप बोलणारी, लहानमुलांना पटकन आपलसं करून समजावणारी आणि  मुख्य म्हणजे पैशाची हाव न धरता मनापासून काम करणारी. नयनचे सर्वच मित्र, सहकारी खूपच चांगले होते पण निहिरानी त्याच्या मनाचा ठाव पहिल्याच भेटीत घेतला. त्याला  प्रथम भेटणारी व्यक्ती  त्याला पहाताच अपराधी भावनेने त्याला म्हणे, " Oh, I am sorry". आणि  मग त्याला जरुरी नसलेली मदत करायची तयारी दाखवी.
पहिल्याच भेटीत निहिरा बोलली होती, " सर, तुमच्या लक्षात यायला हवं, ही मुलं प्रेमाची भुकेली आणि  कुपोशीत तर आहेतच पण त्यांच्यात आपण शिकू शकतो, काही करू शकतो ही जिद्द भरवायला हवी. जगाविषयी वाटणारी भिती घालवायला हवी. तुम्ही नुसतं त्यांना अन्न, निवारा आणि  शिक्षणाच्या सोयी देऊन नाही भागणार." तीचं स्पष्ट बोलणं त्याला आवडलं. मुख्य  म्हणजे तीनी त्याच्या व्यंगाबद्दल बिलकुल  सहानुभूती  दाखवली नाही.
बर्याच ओळखीनंतर तो तीला म्हणाला, "तू किती सहज वर्णन करतेस सगळ्या गोष्टींच, पण मला तर हे ही माहित नाही की आकाशाचा रंग नीळा म्हणजे नक्की  कसा? झाडं हिरवी म्हणजे काय?" त्यावर ती  त्याचा हात हातात घेत म्हणाली, " मोकळ्या आकाशाखाली पहुडतोस, मग एखादी वार्याची झुळुक तुला स्पर्श  करते, तीला रंग नसतोच पण त्या क्षणी सुखावून तुझ्या मनात जे आकाश येतं तोच त्याचा रंग. पानांना किंवा फुलांना ओंजळीत घेताना त्यांचा गंध नाकात शिरतो. गंधाला रंग नसतो पण स्पर्श आणि  गंध अनुभवताना डोळ्यासमोर येतो तोच त्यांचा रंग. पक्षाच्या किलबिलीला रंग नसतोच पण ती ऐकताना डोळ्यासमोर येतो तोच पक्षाचा रंग. अरे, रंग , आकार व्यवहारापुरते. अंतरंगात हरक्षणी उमटतात तेच खरे रंग!"
आत्ताही तो तेच आठवत होता, मनातल्या मनात खुल्या आभाळात रंग भरत होता. निहिराच्याच आग्रहाने तो आॕपरेशनला तयार झाला होता. इतकी वर्षे आॕपरेशन नंतर नाहीच मला हे रंगीत जग दिसलं तर? ह्या भितीनी आॕपरेशनला तो तयारच झाला नव्हता. त्याच्या मनाची तयारी निहिरानी केली. तीचं म्हणणं  " तुला दिसायला लागणारच, पण अगदी समजा नाहीच दिसायला लागलं तर आत्ता काय वाईट चाललय? आणि  मी कधीही असणारच बरोबर."कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक तरीही व्यवहारानी पहाणं आणि  ज्यावर आपलं नियंत्रण नाही ती गोष्ट सहज स्वीकारणं, तो तीच्याकडून शिकला होता.
त्यानी दीर्घ  श्वास घेतला. उद्या तो नितळ मन घेऊन आॕपरेशनला सामोरा जाणार होता. आॕपरेशन नक्की  यशस्वी होणार मग तो दुनियेतले सगळे रंग मनसोक्त  डोळ्यात भरुन घेणार होता. पण काहिही झालं तरी त्याच्या अंतरंगात उमटलेले आईबाबांच्या वात्सल्याचे, आप्तांच्या कौतुकाचे,मित्रांच्या मैत्रीचे,सहकार्यांच्या आदराचे, निहिराच्या सुंदर  प्रेमाचे आणि  परमेश्वराच्या कृपेचे निखळ खरे , पक्के रंग कधीच फिके होणार नव्हते. आकाशाकडे हात जोडत नयन खुशीत हसला. मनापासून.

Mothers day in marathi


आज जागतिक  मातृदिन. आपल्या हिंदू संस्कृती  प्रमाणे प्रत्येक  दिवसच माता, पिता, गुरु आणि  सार्या चराचर सृष्टीच्या उत्सवाचा असतो.पण आता धावपळीच्या आयुष्यात एक दिवस का होईना मातृदिन छान साजरा व्हावा.
पूर्वी म्हणजे लहानपणी आपण आईच्या प्रेमाची महती सांगणारी गोष्ट ऐकली आहे . मुलाच्या प्रेयसीने आईचे काळीज मागितले, ते घेऊन जाताना मुलगा पडला तेव्हा त्या काळजानी विचारलं " बाळा, तुला लागलं तर नाही?"
मला वाटतं ही गोष्ट जुनी झाली आता. निदान आपल्या पिढीतल्या बर्याचशा आया, सुशिक्षित अगर अशिक्षित , निदान आर्थिकदृष्ट्या  स्वतंत्र आहेत. आणि  त्यामुळे थोड्या खंबीरसुद्धा. घरातल्या मोठ्यांची काळजी घेऊन, मुलंही मोठी झाल्यावर, कौटुंबिक  जबाबदार्या पार पाडल्यावर आमची कर्तव्य संपली का? अजुन अंगात शक्ती आहे मुख्य म्हणजे मन ताजं तवानं आहे, काहीतरी करायची इच्छा  आहे, तर मग आपल्या मातृभूमीसाठी जे करायचं बाकी आहे ते आपापल्या आवडीनुसार, कुवतीनुसार का करू नाही?खरंतर आपल्या वयाचे खूपसे लोक हे करतातच.
१) आपली मातृभूमी म्हणजे जमीन , झाडं,फळं,फुलं, पशु,पक्षी,पाणी,नद्या,निर्झर, समुद्र ,एकंदर पर्यावरण.
एखादच का होईना झाड लावून, त्याचं संगोपन करून,घरच्याच कचर्याचं खत तयार करून, परिसर स्वच्छ ठेऊन ,पाणी  वाचवून, नदीनाल्यात कचरा न टाकून , आणि  या सर्वाबद्दल इतरांना जागृत करून, मातृभूमीची सेवा म्हणजे पर्यायाने आपण स्वतःलाच मदत करीत असतो ना?
२) आपला इतिहास.
खरोखरीचे भाग्य म्हणुन आम्हाला इतक्या महान संस्कृतीचा, गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला. फक्त  गुलामगिरीचा शिकवलेला इतिहास आणि जातीभेद, धर्मभेद,आपल्या संस्कृतीची लाज बाळगणं हे सोडून आमचा खरा इतिहास, संस्कृती  ह्याचा अभ्यास करू, इतरांनाही समजावून देऊ.अभिमानाने म्हणु आम्ही भारतीय एक आहोत, भले आमचे धर्म, जाती, भाषा,रुढी,परंपरा,पोषाख,वेगळे असतील. दुफळी माजवणार्या घटकांना दूर ठेऊ. भारताच्या  स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक  क्रांतीकारकाची, समाजसुधारकाची आदराने आठवण ठेऊ.
३) समाज.
     सर्वांशी सुसंवाद साधणं,लहान मुलांना चांगले संस्कार  देणं, नियमानी वागणं, भारतीय घटनेचा मान ठेवत आपल्या हक्कांची आणि  कर्तव्यांची जाण ठेवणं व इतरांना ती करुन देणं.जिथे आवश्यक आहे व शक्य आहे तिथे यथाशक्ति  अर्थिक, वैचारिक अगर श्रमाची मदत करणं इतकं तर आपण करु शकतो.पण कुणालाही सतत फुकट घेण्याची  सवय मात्र लागू नये. आपल्या रक्षणासाठी लढणारे सैनिक, अन्न पुरवणारे शेतकरी, पोलीस व इतर सर्व  सेवा पुरवणार्यांसाठी कृतज्ञ राहून छोटी मोठी कामे करू शकतो.
४)देशाचा अभिमान
देशप्रेम हा ऐच्छिक  विषय नाही. तुमचं अस्तित्वच ज्यांच्यामुळे आहे ते आई,वडील आणि  देश यांचा मान ठेवलाच पाहिजे. तिरंगा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपत्ति, देशाची घटना, देशाचा प्रत्येक  नागरिक , विशेषतः स्त्रिया  व वृद्ध यांचा मान राखला गेलाच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वरील गोष्टींचा  अपमान करणार्यांनी देशातून बाहेर जावे.
मला वाटतं आज मातृदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मातृभूमीच्या ऋणाचे स्मरण करून एखादा छोटासा का होईना संकल्प करूनआपल्या मातृभूमीप्रती  कृतज्ञता व्यक्त  करू या.
विशाखा टिपणीस
१२/०५/२०१९

बालदिन - बालमन


काल एका काकांचा फोन आला. त्यांचा माझा परिचय अगदी अल्प. माझ्या सासूच्या मैत्रीणीचे यजमान. मावशी आमच्याकडे  खूप यायच्या. पण गेली कित्येक वर्षे त्यांना स्मृतिभ्रंश झालाय. मागे एकदा त्यांना भेटून आले मग जाऊ जाऊ म्हणत मागेच पडलं.
तर काय सांगत होते, फोनवर काकांनी परिचय दिला. एकदम नाही आलं लक्षात. काही क्षणांनंतर मला ओळख पटली. तसे काका गरजले, " ट्यूब उशीरा पेटली तुझी!" नंतरचं बरचसं संभाषण मी बरेच दिवसात त्यांच्याकडे  गेले नाही, फोन केला नाही,माझ्या बातम्या त्यांना कशा बाहेरून कळल्या, वगैरे आरोपांच्या फैरी झडल्या. मी माझी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण अडचणी सर्वांनाच असतात म्हणत तो परतवला गेला.
मग हळू हळू संभाषणाची गाडी ते कसे बुद्धीमान आहेत,त्यांची अर्थशास्त्रातली Ph.D , त्यांनी आयुष्यात गाजवलेलं कर्तुत्व,त्यांची गाण्याची आवड,अफाट वाचन,नियमित फिरणं,चांगली तब्येत( वय वर्ष ८६),स्मृतिभ्रंश झालेल्या बायकोला ते कसे लहान मुलासारखे सांभाळतात वगैरे अनेक विषयांभोवती फिरली. माझी भूमिका अर्थातच श्रोत्याची.
बोलता बोलता त्यांनी बजावलं १ ते ४ त्यांना disturb करायचं नाही,सात नंतरच फोन करायचा. भेटायला ते म्हणतील तेव्हाच जायचं. त्यांची स्वतःची मुलगी त्यांना गेल्या वर्षात ३/४ वेळा भेटायला आली होती पुण्यातच असून.( काही कारण असेल, मला माहित नसणारं)
फोन बंद करता करता म्हणाले, "फोन कर मधुन अधुन. भेटायला आलीस तर खूप छान छान कविता ऐकवीन तुला, माझ्याकडे  खूप कलेक्शन आहे.
खरं तर मला जरा रागंच आला होता. त्यांचा चेहराही मला स्मरत नव्हता. पण मग एक करारी तरीही केविलवाणा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तरुणपणातला ताठा संपलेला,परिस्थितीने काळवंडलेला,मीपणा अट्टाहासाने जपणारा,एकाकी ,वृद्ध तरीही जगायची उर्मी असणारा, कोणीतरी श्रोता होऊन आपलं मनोगत ऐकावं अशी अपेक्षा करणारा,केविलवाणेपणा मीपणानी झाकणारा,तरीही माणसातल्या लहान मुलाचा निरागस चेहरा.
             आणि
खूप समाधान वाटलं काकांनी माझी निवड केली श्रोता म्हणून. ठरवलं चांगला श्रोता व्हायचं, अशाच कुणा काका,मावशी किंवा अगदी समवयस्कांचा. आताच्या काळात फार गरज आहे अशा श्रोत्यांची.
पुढे आपण म्हातारे होऊ तेव्हा कदाचित कोणाला ऐकायला सवड नसेल. म्हणून आत्ताच मित्र,मैत्रीणी, आप्त,हितचिंतक  ज्यांना ज्यांना जेव्हा भेटता येईल,बोलता येईल तेव्हा मन मोकळं करू या,त्यांचं मन जाणून घेऊया. माणसात राहू. प्रत्येक  क्षण जगून घेऊ.  मनातलं लहान मुल जागं ठेऊ.
मनातलं लहानमुल जागं ठेवणार्या प्रत्येकाला बालदिनाच्या रंगीत संगित,गोड शुभेच्छा!
विशाखा टिपणीस
१४/११/२०१८

सी.के.पी. खाजाचा कानवला.


सी. के. पी. खाजाचा कानवला.
दिवाळी साजरी करताना दिवाळीच्या फराळाला दिव्यांइतकच अनन्यसाधारण महत्व आहे. आता सर्व  पदार्थ  वर्षभर विकत मिळत असले तरी दिवाळीचा फराळ घरी, स्वतःच्या हाताने बनवायचा आनंद काही औरच.
रव्याचा लाडू हा फराळाचा राजा असला तरी चटकदार चिवडा व खमंग चकलीच भाव खाऊन जाते. ह्या फराळात नाजुक साजुक करंजी  करताना तीचे सांभाळावे लागणारे नखरे आणि  फटाकड्या चकलीपुढे  तीचे सौम्य सात्विकपण जरा फिकेच पडते.
पण ह्या करंजीचाच सख्खा भाऊ "खाजाचा कानवला" समस्त सी.के.पी. घरच्या फराळात अनभिषिक्त सम्राट म्हणून मिरवतो. ह्याला साठ्याची करंजी म्हणणे हा त्याचा घोर अपमान आहे. सी.के.पी. सुगरणपणाचे जे मापदंड आहेत त्यात खाजाच्या कानवल्याचे स्थान फार उच्च आहे.
कानवल्याची वेलदोडा व केशराच्या वासाने घमघमणारी चविष्ट पिठी किंवा सारण तयार करताना कानवला फुटणार नाही असे पदार्थ  चोखंदळपणे त्यात घालावे लागतात. मग रवा किंवा मैदा दूधपाण्यात भिजवून तुप घालत घालत कुटायचा मऊ लोण्याइतका होईपर्यंत, ( ह्या क्रियेत सुगरणी डोळ्यासमोर नवरोबांना आणतात) मग तुपात  तांदुळाची पिठी किंवा काॕर्न फ्लाॕवर घालून आपण आवडतं गाॕसिप जितकं फेसतो तस्सच भरपूर फेसायच. मग पिठाची पोळी लाटून तीला बोटाने खड्डे पाडून त्यावर फेसलेली पिठी ( मला नक्की  शब्द आठवत नाही, बहुतेक साटा )पसरायची. अशा एकावर एक रंगीत पोळ्या ठेऊन त्यांची वळकटी वळायची आणि  त्याच्या लाट्या करायच्या. आता हे प्रकरण भलतच नाजुक  असत. कोणी तशाच दाबून लाटतात तर कोणी पगड्या वळून लाटी लाटतात. पिठ न लावता हलक्या हाताने एकाच बाजूने पुरी लाटायची. मग त्यात सारणही नाजुक  हातानी पण गच्च भरायचं (खुळखुळे चालत नाहीत.) मग कानवला नीट बंद करून तुपात झार्यानी तेल उडवत एकाच बाजूने तळायचा.तळताना त्याला नाजुक  पंख फुटु लागतात. जसजसे पापुद्रे सुटतात तसतसे सी.के.पी. सुगरणीच्या मनात आनंद तरंग उठु लागतात. हे अलवार कानवले तुप निथळवून अलगद ठेवावे लागतात. ही साधना पूर्ण  पेशन्स् ठेऊन,एखादं तप करावं तशा भक्तिभावानी करावी लागते. त्याचं सार्थक नर्कचतुर्दशीला नैवेद्य  दाखवून खाणार्यानी तोंडात टाकताच मधुर चव तोंडात घोळवत कानवला विरघळला कि वाह म्हणून डोळे मिटून दाद दिली की होते.
हे कानवला पुराण सी.के.पी.जातीचा उदोउदो करण्यासाठी नाही. प्रत्येक जातीत असे चविष्ट मानदंड असतात. एरवी जातपात मानू नये पण प्रत्येक जातीने आपली वैशिष्ट्यपूर्ण  खवैय्येगिरी सर्वांशी शेअर करावी. ह्या वर्षी फेसबुकच्या कृपेमुळे असंख्य  सुगरणींनी केलेले सुंदर  पापुद्रे सुटलेले,रंगीत,शुभ्र,दोन रंगांचे, चटईचे,गुलाबफुलांचे असे लाखो कानवले पहायला मिळाले आणि  डोळे तृप्त  झाले. शतकानु शतके अशा परंपरा जपणारी आपली संस्कृती खरच  थोर आहे. (कृती सांगताना काही चूकभूल झाली असल्यास सी.के.पी. सुगरणींनी कृपया माफ करावे.)
विशाखा टिपणीस.
८/११/२०१८

पुणे अभिमान

अभिमानास्पद! 

केन्द्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयातर्फे सोमवारी प्रसिद्ध  करण्यात आलेल्या यादीत पुणे हे रहाण्यासाठी,जगण्यासाठी सर्वात सुंदर  शहर ठरले आहे.
मूळातच पुणे हे एक भाग्यवान शहर आहे.सुंदर  निसर्ग ,गर्व करावा अशी ऐतिहासिक  परंपरा लाभलेलं,अनेक सुंदर  देवस्थानं असलेलं.पुणेकरांनी आपल्या बुद्धीवैभवानी पुण्याला विद्येचं माहेरघर बनवलं आणि आता उद्योगांचं,IT क्षेत्राचही.
जिजाऊआईसाहेबांनी,छोट्या शिवबासमावेत,छोट्या पुनवडीची पुण्य नगरी केली. पण इतिहास इथेच थांबत नाही.पेशव्यांनी मराठ्यांचं वैभव कळसाला नेलं.
पुढे अप्पा बळवंत,चापेकरबंधु असे देशासाठी फासावर चढलेले क्रांतीकारक,लोकमान्य टिळकांसारखा,बुद्धीमान,धडाडीचा,द्रष्टा राजकारणी आणि समाजकारणी,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले आणि  महर्षी कर्वे हे स्रीशिक्षणाचा पाया घालणारे आणि प्रसार करणारे समाज सुधारक,र,धो.कर्वे, दिनकरराव व इरावतीबाई कर्वे,न.चि. केळकर,रँगलर परांजपे,शकुंतला परांजपे,अनेक विचारवंत,समाजधुरीण याच पुण्यातले.
सिंहगड,पर्वती,चतुःशृंगी,जोगेश्वरी,कसबा गणपती,सारसबाग, शनिवार वाडा,फर्ग्युसन टेकडी, राजा केळकर म्युझियम अशी काही धार्मिक ,काही पर्यटन स्थळं, आपला शेकडो वर्षांचा लौकिक  जपून आहेत. लोकमान्यांनी  सुरू केलेला गणपतीउत्सव आणि  दगडूशेठ गणपती जगभर प्रसिद्ध  आहेत.
सावित्रीबाई फुले विद्यापिठ,एस. एन. डी. टी.,फर्ग्युसन ,एस,पी, वाडीया,अनेक नामवंत जुन्या शाळा या बरोबर अनेक शाळा,काॕलेजे प्रसिद्ध  आहेत.
पुण्याचे उद्योगक्षेत्र,IT hubs देशी,परदेशी तरुणांना आकर्षित  करतात.
एन.डी. ए.ही राष्ट्रीय  प्रबोधिनी सैन्याचे अधिकारी घडवते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने  महत्वाच्या अनेक संस्था पुण्यात आहेत.
कलेचा वारसाही पुण्याला मोठा लाभला आहे. प्रभात स्टुडीओ,म्हणजे आजचे,फिल्म इन्टीट्यूट,सवाई गंधर्व मोहोत्सव,वसंत व्याख्यानमाला,बालगंधर्व,टिळकस्मारक,अशी अनेक नाट्यगृहे,जुन्यापासून मल्टीप्लोक्स पर्यंत सिनेमागृहे, पुणेकरांच्या गायन,नृत्य,नाटक,सिनेमा वेडाची साक्ष देतात.
पुणेकर रसिक खादाड ही आहेत. चितळे,प्रभा विश्रांती गृह,बेडेकर मिसळ असे जुने अभिमान बाळगणारे,वैशालीचा वाढदिवस परदेशात करणारे,पुणेकर खरे खाद्य रसिक आहेत. पुण्याला दर दहाफुटावरा असलेली हाॕटेल्स्,टपर्या रात्रंदिवस ओसंडून वाहत असतात.JWMarriet पासून अमृततुल्य पर्यंत खादाडांची गर्दी असते.
शरीर व मनाचे आरोग्य  जपणारी अनेक  उद्याने, क्रिडांगणे,जलतरण तलाव,जिम्स व उत्कृष्ट  वैद्यकीय  सेवा देणारी हाॕस्पिटल्स व अनेक  प्रसिद्ध  धन्वंतरी पुण्यात आहेत,
पुण्यातली तरुणाई,विविध क्षेत्रातील अभ्यास, संशोधन,शास्त्रीयअसो वा पाश्चात्य, संगित,नृत्य,सिनेमा,नाटक,अन्य कला,विविध खेळ,उद्योग,सामाजिककार्य ह्यात नुसता interest घेत नाही तर अनेक प्रयोग करते. अनेक सकारात्मक चळवळी येथे चालू असतात.वयस्कर मंडळीसुद्धा morningwalk बरोबर अनेक चर्चा व सामाजिक  उपक्रम चालवतात. बायकाही कशात मागे नाहीत. आणि  हो,कितीही माॕल येऊ देत,तुळशीबाग आणि  लक्ष्मी रोड ही आमची पिढ्या न् पिढ्या आवडीची खरेदीची ठिकाणं आहेत.
खूप काही लिहायचं राहून गेलय.
असो,प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये  असतात आणि  काही प्रश्न  पण,पुण्याचेही आहेत. विशेषतः कचरा कोंडी आणि  वहातूक कोंडी. पुणं ज्या तर्हेनी वाढतय,असे प्रश्न  येणारच आणि ते सोडवायलाही पाहिजेत.
तरीही पुणं हे एक नैसर्गिक ,ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,बौद्धिक  वारसा लाभलेलं सुंदर  शहर आहे आणि  तिथे येऊन रहाण्याचा मोह कुणालाही होणारच.पुणं तिथे काय उणं हे खरं असलं तरी पुण्याला उणेपण येऊ नाही व त्याचं सौंदर्य  दिवसेंदिवस वाढावं म्हणून पुणेकरांनी प्रयत्न करायलाच हवेत.
पुण्यापाठोपाठ,नवीमुंबई,मुंबई व ठाणे यांनीही नंबर पटकावले, हे विशेष अभिमास्पद. नव्यामुंबईने थोड्या काळात कौतुकास्पद प्रगती  केली आहे,आमची मुंबईनगरी सबसे प्यारी आहेच आणि  ठाणे म्हणजे तर पुण्याचाच भाऊ.ठाणेकर,सर्व बाबतीत पुढाकार घेऊन असतात. महाराष्ट्रातील  चार शहरं पहिल्या दहामध्ये यावीत हे नक्कीच  अभिमानास्पद.
जय महाराष्ट्र ! भारतमाताकी जय!
        .       विशाखा टिपणीस
               अभिमानी पुणेकर.
               १४/०८/१०१८

दोन मृत्युः आत्मघात आणि बलीदान

दोन मृत्यु! 

अगदी तरुणच दोघही. अजून धड आयुष्य न पाहिलेले. दोन्ही मृत्यु नैसर्गिक  नव्हते. एकानी मृत्युला आपणहून कवटाळलं आणि  दुसर्यानी मृत्युला छातीवर झेललं. तरीही किती फरक त्या दोन मृत्युंमधे. एक आत्महत्या आणि  दुसरं बलीदान.
आत्महत्या जी नैराश्यातून आली.नुसत्या नैराश्यातून आली असेल? की कोणीतरी brain washing केलं असेल? आपल्या मरणानी आपल्या समाजाचं ,कुटुंबाचं भलं होईल,आपण हिरो ठरू असा काहीसा विचार किंवा अविचार असेल कोणीतरी भरवून दिलेला? जीव देताना आपले असहाय आईवडील,कुटुंब डोळ्यासमोर आलच नसेल? बलीदानाने तो काही काळापुरता,काही लोकांपुरता हिरो ठरलाही.पण हे बलीदान होतं की आत्मघात. त्याच्या मृत्युला बलीदान ठरवून काही राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नही केला असेल. तो एकाच जमातीचा भाग ठरला. जवळचे सोडून त्याचं नांवही सगळे विसरून जातील. त्याला नाहीच पण त्याच्या कुटुंबालाही काही फायदा मिळणार नाही. कुणाच्यातरी नादी लागून ओढवून घेतलेली बरबादी.जिद्द धरून जिवंत राहीला असता तर काहीही करू शकला असता.
दुसरा मृत्यु देशासाठी . खरं बलीदान. मृत्यु समोर दिसत असताना त्याच्याही डोळ्यासमोर आले असतील त्याचे प्रेमळ आईवडील,राखी तयार ठेऊन वाट पहाणारी बहिण,अजूही नविनच असणारी प्रियतमा आणि  दोन वर्षाचं अबोध पिलू.पण क्षणार्धात  समोरचा राक्षस माझ्या लाखो आईवडीलांचे,प्रिय देशबंधुभगिनींचे प्राण घेऊ शकतो मग त्याला मारायलाच पाहिजे,माझे ध्येय देशरक्षणाचे आहे, हा अगदी सुसंगत  पक्का विचार. शत्रूला तर चारीमुंड्या चीत केलच पण मृत्युला पुढे होऊन त्यानी छातीवर घेतलं तेव्हा मृत्युसुद्धा भयभीत झाला असेल.
ज्याच्या मरणाने प्रत्येक  भारतीय खराखुरा हळहळला,रडला,ज्याचं नांव अत्यंत आदरपूर्वक,अभिमानाने कायम घेतलं जाईल तो वीर हाच खरा हीरो. त्याच्या कुटुंबाचा सारा देश कायम ऋणी राहील. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोनी लोक जमले ते आपले सर्व भेदभाव विसरून.श्रीमंत गरीब,स्त्री पुरूष,बडे सामान्य,सर्व स्तराचे,जाती धर्माचे लोक अश्रू ढाळत त्याला मानवंदना देत होते तेव्हा ते फक्त  भारतीय होते.
एकाच्या मृत्युने समाजातली दरी अधिक रुंदावली आणि  दुसर्याच्या मृत्युने सामाजिक  एकीचे दर्शन घडवले.
मेजर कौस्तुभ राणे आम्ही भारतीय, तुझे बलीदान कधीच विसरणार नाही. आमच्या मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवून तू अमर झालास.तुझ्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. 
                   विशाखा टिपणीस
                   ११/०८/२०१८

मैत्री दिवस शुभेच्छा.


खरंच मैत्रीला गरज आहे ,एका स्पेशल दिवसाची,संदेशाची,रेशमी धाग्याची?
जिथे प्रत्येक  श्वास उत्सव असतो, शब्दाविना भावना पोचते,मनं गुंतलेली असतात,
तिथे खरंच का अशी गरज आहे?
मैत्री, मग ती ,
तो आणि  तो,
कृष्ण सुदाम्याची असेल,
ती आणि ती,
उषा चित्ररेखेची असेल किंवा
शब्दावाचून मनं वाचणार्या
तो आणि  तीची असेल.
प्राण्या,पक्षांशी असेल,
झाडा फुलांशी असेल,
अथांग समुद्राशी असेल,
असीम आभाळाशी असेल.
निखळ,नितळ,मुक्त ,निःशंक
ती मैत्री.
कधी हास्याच्या खळखळाटात,गोंगाट कलकलाटात,
तर कधी ओलावल्या डोळ्यांनी,
समंजस शांततेत ती साजरी होते,
कधी दुसर्या बाजूनी रुसण्यात,
आणि  समजूत घालताना आपला मी सुखावण्यात असते
ती मैत्री.
गाठी भेटी,गप्पा गोष्टी,संवाद
हवाहवासा असतो
पण आवश्यक नसतो
ती मैत्री.
जिथे हेव्यादाव्यांना जागा नसते,
गैरसमज क्षणिक आणि
विश्वास अक्षय असतो,
ती मैत्री ***
तरीही  मैत्री दिवसाच्या मनःपूर्वक   शुभेच्छा. 
               विशाखा टिपणीस
               ५/८/२०१८

Gulabjam -Marathi movie Review

काल ' गुलाबजाम' पाहिला. आवडला. ह्या सिनेमानी मला खुप विचार करायला भाग पाडले. सिनेमा आवडण्याचे कारण तो बर्यापैकी वास्तव आहे आणि  positive  आहे.
जीला भूतकाळच्या आठवणी नाहीत,भविष्यकाळची स्वप्न नाहीत अशी नायिका,परिस्थितीने एकदम एकाकी झालेली, आयुष्याची मधली वर्ष हरवल्याने वय वाढलं तरी व्यवहार न येणारी, थोडी विचित्र,सायको,कोशात रहाणारी पण जी पाककला ती विसरली नाही ती फक्त  तीच्या निर्वाहाचं साधन नाही,त्यात तीचं पूर्ण मन आहे.आज जिथे अभ्यास झाला नाही,नापास झाले,आई रागावली असल्या कारणांवरून मुले आत्महत्या करतात तिथे ही खंबीरपणे जगत्ये. मरण्याचा विचार तीच्या मनातही येत नाही.
नायक, तरुण देखणा,श्रीमंत,सुशिक्षित,इंग्लंड मधे चांगल्या पगाराची नोकरी असणारा,त्याला girlfriend ही आहे,जिच्याशी त्याचा नुकताच साखरपुडा झालाय.एकंदर काहीच कमी नाही. पण न आवडणारं शिक्षण घेऊन पैसे कमावल्यावर त्याला त्याच्या आवडीप्रमाणे महाराष्ट्रियन rather पुणेरी authentic  जेवण करायला शिकून,इंग्लंड मधे हाॕटेल काढायचय,ज्याच्या चालण्याची खात्री नाही.लहानपणापासून त्याच्या स्वैपाकाच्या आवडीला घरच्यांनी सुरुंग लावलेला आहे. योगायोगाने,खुप अडचणींनंतर तो नायिकेकडे स्वैपाक शिकू लागतो आणि त्याच्यातला संवेदनशील माणूस तीच्या वास्तवाने हेलावून जातो. तीचा शिष्य बनता बनता तो तीचाच पालक बनतो.तीचं आयुष्य जास्त चांगलं,यशस्वी करण्यासाठी धडपडतो. ज्यावेळी लक्षात येतं की तो तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतोय,ती त्याच्यावर अवलंबून आहे तेव्हा तो तीच्या काॕलेजचा भेटलेला मित्र ज्याला ती विसरली आहे पण तो मित्र अजुनही तीच्याविषयी नाजुक भावना बाळगून आहे,त्याला तीच्या आयुष्यात अगदी सहज सामिल करू इच्छितो.नायकाच्या इंग्लंडला जाण्याने नायिका एकाकी होऊ नये म्हणुन.स्वतःच्या स्वप्नाला तो तिलांजली देत नाही आणि तीलाही बेसहारा करत नाही.
त्याचं इंग्लंडला जाणं दोघही accept करतात,कितीही दुःखद असलं तरी एकमेकांसाठी ते सोपं करायचा प्रयत्न करतात. तो इंग्लंडला यशस्वी होतो,तीही मित्राबरोबर आनंदी रहायचा प्रयत्न  करते,विनातक्रार.ती नायकाला सल्ला देते,मसाले पाठवते,त्यांचं नातं तसच घट्ट रहातं.
गेल्या सात आठ दशकापासून सिनेमातल्या हिरो हिराॕईनचे प्रेम जमलेच पाहिजे असा आपला समज आहे.हल्ली हल्ली स्त्री पुरुषाची मैत्री असू शकते,इथंपर्यंत आपली मजल गेलेली आहे. पण मैत्री पलीकडचं एक नाजुक नातं असू शकतं,नव्हे आपल्या बहुतेकांच्या मनातही ते असतं,जे कबूल करणं कठीण असतं.मग आपलं असेल तर आपण मैत्री म्हणतो,दुसर्याचं असेल तर भानगड म्हणतो. ह्या सिनेमातही हा रेशमी धागा आहे,नाजुक  पण चिवट. दोनदा आलेली मिठी ते नातं दाखवते. नेहमी मिठी म्हणजे वासना नव्हे,काहीवेळा भावना व्यक्त  करण्याचं, आधार शोधण्याचं आणि  देण्याचं स्पर्श हे शब्दापेक्षा प्रभावी साधन आहे.
बाकीच्या  व्यक्तीरेखाही आवश्यक म्हणुनच आहेत आणि  खर्या आहेत.नायकाची girlfriend  आजची मुलगी आहे,व्यवहारी ,तीला परदेशातलं संपन्न आयुष्य त्याच्याबरोबर जगायचय.नायिकेची बहिण सामान्य गृहिणी आहे.तीला आपलं आयुष्य सरळ जगायचय,त्याबरोबर बहिणीला सासरकरांनी स्वैपाकीण म्हणुन वागवलेलंही तीला पटत नाही.नायकाचा मित्र आजच्या IT जगाचा प्रतिनिधी,पैसा मिळवणारं मशीन. मावशीबाई आणि  पोपट,पैशासाठी काम करणारे,समजत नसली तरी,नायिकेला समजवून घेणारे,पेपर वाचणारे आजोबा,मूक साक्षीदार.
एक प्रसंग खुप आवडला.नायिकेकडे ८/१० वर्षांची मुलगी भिक मागते,पैसे मोजता न येणारी नायिका तीच्यापुढे पर्स करते,ते निरागस लाचार बाल्य,त्यातली १० रुपयांची नोट घेऊन पर्स परत करते.असा प्रामाणिकपणा आला तरी आपण खुप सुधारू. आणि  लहानपणापासून मनात घर करून राहीलेली भजी विकण्याची इच्छा तीच्या बरोबर पूर्ण करून त्यानी लुटलेला अपरिमित आनंद. खुप गोड प्रसंग.
सुरेख  दिग्दर्शन . नायिकेच्या आयुष्यासारखेच तीचे मळखाऊ रंगाचे कपडे आणि  घरातल्या साध्या स्लीपर. सुंदर ,संयत संगिताचा फक्त  background ला केलेला वापर,खुप effctive.( इथे पिनाकचं,माझ्या भाच्याचं विशेष कौतुक). अत्यंत निगुतीने केलेले देखणे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ तर चित्रपटाचा मुख्य गाभाच. सोनाली,सिद्धार्थचा सुंदर  स्वाभाविक अभिनय. सिद्धार्थचं विशेष कौतुक . सोनाली समोर तितक्याच ताकदीचा अभिनय करणं म्हणजे खायचं काम नाही.
हे चित्रपटाचं परिक्षण वगैरे नाही. आपल्याच जीवनाची झलक. आजूबाजूला रोज बरच काही घडत असतं.खून,मारामार्या,जातीद्वेष,किळसवाणं राजकारण, अन्याय,भ्रष्टाचार.आपल्यासारख्या संवेदनाशील लोकांना न आवडणारं पण आपल्या control  बाहेरचं.आपणही सहन करत असतोच,अवहेलना,अपमान.पण मग हेच धरून ठेवायचं की छोटे छोटे आनंद शोधायचे? समंजस नाती जास्त अपेक्षा न करता घट्ट टिकवून मनाला गारवा शोधायचा की कोण काय म्हणेल याची चिंता करत आपलच मन चुरगळून टाकायचं?आपल्याला आनंद देणारं कधीतरी काही करायचं की सतत समाजाला मान्य असलेल्या मळल्या वाटांवरूनच चालायचं? प्रत्येक  गोष्टीत,व्यक्तीत चुका आणि खुसपटं काढायची की चांगल काय आहे ते पहायचं? प्रत्येक  परिस्थितीत हातपाय आपटून निराश होऊन बसायचं की जे आहे ते तसच स्विकारून पुढे जायचा मार्ग  शोधायचा? ठरवायचं ज्याचं त्यानीच.
                    विशाखा टिपणीस.
                    १०/०३/२०१८

अन्न हे पूर्ण ब्रह्म-


           आपण लहानपणापासून ऐकत आलोय अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला जागणे,खाऊन माजावे पण टाकून माजू नये,भरल्या ताटावरून ऊठु नये,अन्नाचा अपमान केला तर अन्नान्न दशा येते वगैरे वगैरे. लहानपणी वदनी कवळ घेता म्हणूनच जेवायचे आणि  पानात टाकायचे नाही हे दोन नियम शिकलो.अन्नाने आपले पोषण होते. मग ह्या अन्नाचा आदर का नाही राखला जात सगळीकडे ? काही लोक अभिमानानी सांगतात, आमच्याकडे  सकाळचं संध्याकाळी  चालत नाही,उरलं तर आम्ही फेकून  देतो.लग्नसमारंभ,पार्ट्या,हाॕटेल्स् इथे कितीतरी अन्न वाया जातं. जेव्हा माहित आहे की आपल्या देशात लाखो लोकांना अन्न मिळत नाही.

ह्या संदर्भात नेहमी येणार्या दोन पोस्ट मला खुप आवडतात.
आपल्याकडचे काही लोक जर्मनीत गेले. प्रचंड भूक लागली म्हणून एका हाॕटेलात गेले. खुप काही मागवले,भूक भागल्यावर उरलेले टाकून देऊन,बिल देऊन निघाले.तेव्हा पलीकडच्या  टेबलावरच्या काही आजीबाईंनी अडवलं. चक्क रागे भरल्या. उरलेलं पार्सल करून घेऊन जा,म्हणुन मागे लागल्या. एकानी गुर्मीनी विचारले ,आम्ही बिल भरलय,तुम्हाला काय करायचय? तेव्हा आज्या चवताळल्या,चिडून बोलल्या,ही आमची राष्ट्रीय संपत्ति आहे,तीचा अपव्यत करायचा अधिकार कोणालाही नाही.

दुसरी पोस्ट,खुप देशात तुम्ही काॕफीशाॕपमधे गेलात तर एक काॕफी स्वतःला घेऊन, तुमच्या इच्छेप्रमाणे एक किंवा अधिक  काॕफी सस्पेंडेड किंवा  आॕन द वाॕल घेऊ शकता.जी नंतर एखाद्या गरजू गरीबाला दिली जाते.किती छान पद्धत आहे ना?

मग हा awareness  आपल्याकडे  का नाही?
एकदा आम्ही हाॕटेलमधे गेलो होतो. पलीकडे  आई वडील,छोटी मुलगी बसली होती. मागव मागव मागवलं आणि  बरचसं टाकून दिलं. मी वेटरला विचारलं ह्या अन्नाचं काय करणार? तो म्हणाला टाकून  देणार, मी त्यांच्या टेबलापाशी जाऊन बोलले,एवढं महागाचं,ताजं चांगलं अन्न आहे, पार्सल का नाही करून घेत? मुलगी आणि  तीची आई अर्थातच माझ्याकडे  अत्यंत तुच्छतेने,काय येडपट बाई आहे म्हणुन बघत होत्या. पण मी माझे म्हणणे पुढे रेटल्यावर बाबा म्हणे, अहो,पण आम्हाला नको आहे. मी म्हटलं,जाताना सिग्नलला भेटलेल्या गरीब मुलांना द्या ना.मग त्यांना पटलं.

पण ह्याही वरताण एक  गोष्ट वाचली,असं म्हणे आपण चांगल्या मनानी कोणाला खायला दिलं तर थोडं खाल्ल्यावर ते गडाबडा लोळायला लागतात आणि  ते खाणं बाधलं असं दाखवून पैसे उकळतात.

आमच्या आॕफिसमधे दर चतुर्थीला त्या महिन्यात निवृत्त होणारे लोक सर्व आॕफिसला साबुदाणा खिचडी,बर्फी आणि  मसाला दूध देतात. जे आमचेच एक सहकारी,ज्यांचा घरचा केटरींगचा व्यवसाय आहे ते बनवून आणतात.एका महिन्याला खिचडी खुपच छान झाली होती. सेक्शनमधे तेच कौतुक चाललं होतं तेवढ्यात आमच्या एक सहकारी आल्या आणि  म्हणाल्या," शी, काय खिचडी झाली होती? आम्ही सगळ्यांनी चारचार प्लेटी घेतल्या आणि  टाकून  दिल्या." मी रागानी म्हटलं,"अहो,चार नाही,प्रत्येकी एकच प्लेट होतीआणि  छान झाली होती खिचडी,एवढ्या सुगरणी असाल तर इथे खात जाऊ नका."
वरची माझ्या छोट्या अनुभवातील प्रातिनिधिक उदाहरणं.पण हा बेजबाबदारपणा आणि  बेमुर्वतपणा,कसा दूर करायचा? काही संस्था,हाॕटेल किंवा समारंभात उरलेलं ताजं अन्न,व्यवस्थित,स्वच्छपणे गोळा करून गरीब वस्त्यातून वाटतात. काही हाॕटेल बाहेर फ्रिज ठेऊन,उरलेलं ताजं अन्न फाॕईलमधे ठेवतात,हवं त्यांनी घेऊन जावं. पण ह्या संस्था थोड्या आहेत आणि अशा योजना किती दिवस व्यवस्थित चालत असतील माहित नाही.
मला वाटतं,आपणा सर्वांना,विशेषतः गृहिणींना वाटतं कि त्यांनी प्रेमानी,सर्वांच्या आवडी जपत केलेले पदार्थ  जर जास्त असतील तर  ते वाया जाऊ नाहीत. मग आपण उरलेल्या पदार्थांना नवे रुप देऊन,नवे पदार्थ करतो. पार्टीत उरलं तर फाॕईल किंवा डबे भरून घरोघरी देतो,त्यामुळे अन्न वायाही जात नाही आणि  पाहुण्या गृहिणीला घरी जाऊन संध्याकाळी  स्वैपाकही करावा लागत नाही. आपण प्राणी,पक्षी यांनाही खायला देतो. ते आपल्यापेक्षा व्यवस्थित असतात. पोटाच्यावर खात नाहीत. माझ्या कुत्र्याने खाताना उडवलेली शिते,नंतर पारवे येऊन खाऊन जातात. अंड्याचा पिवळा बलक नको असेल तर अर्ध्या कवचात ठेवला तर कावळा अलगद,न सांडता घेऊन जातो. उरलेली पोळी, भाकरी,पराठा चुरुन वाडग्यात ठेवला तर चिमण्या,बुलबुल खाऊन जातात.
प्रत्येकानी पहिला घास घेताना, आपल्याला अन्न पुरवणारा निसर्ग,प्राणी,शेतकरी,,भूक तहानेची पर्वा न करता आपले संरक्षण करणारे सैनिक,पोलीस,अन्न शिजवणारे आणि  वाढणारे हात ह्यांचं कृतज्ञतेनी स्मरण केलं तर अन्न वाया घालवायची इच्छाच होणार नाही.
मला सुचलं ते लिहिलं.विषय महत्वाचा आहे म्हणून लांबला. तुम्हीही सुचवा नं अन्न वाया जाऊ न देण्याचे आणि ते  योग्य लोक,पशु,पक्षांपर्यंत पोचवण्याचे आणि सर्वांच्या जाणिवा जागृत करण्याचे सहज सोपे उपाय, जे तुम्ही करत असाल किंवा तुमच्या मनात असतील.

                 विशाखा टिपणीस
                 १९/०१/२०१८

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...